बीड : मराठा समाजाला आरक्षण  (Maratha Reservation) मिळावे म्हणून अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातले भाजपचे विधान परिषदेचे आमदार आमदार सुरेश (Suresh Dhas) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासह सर्वच राजकीय नेत्यांना षंड म्हणून घरात बसण्याची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे..


कोरोना काळात 24 तास बाहेर असणाऱ्या माझ्यावर आता मात्र मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ आली आहे, सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर ही वेळ आली आहे आणि ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासनाने या बाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तरुणांनी आत्महत्येसारखा निर्णय घेऊ नये. यावर तोडगा जरूर निघेल. आत्महत्या हा यावर पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहनसुद्धा धस यांनी केले. 


सांगलीत सर्वपक्षीय आमदार-खासदारांचे एक दिवसाचे उपोषण 


सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेत आरक्षणाबाबत जाब विचारला होता. तसंच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांना केली होती. 


मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या


मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा  दिवस आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर सरकारकडे दोनच पर्याय राहिलेत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना तरा, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. 


छत्रपती संभाजीराजे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन


छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची कॉलवरून विचारपूस केली. आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण उपोषण करत आहात ठीक आहे, परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती करत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.


ही बातमी वाचा: