लखनौ : टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले आहेत. या यशात संघाचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला पहिला सामना वगळता उर्वरित सर्व सामन्यांमध्ये रोहितने भारताला झंझावाती सुरुवात करून दिली आणि पॉवर प्लेमध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली आहे. त्यामुळे गोलंदाजांना रोहित शर्माची भीती वाटू लागली आहे. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने रोहित शर्मावर विधान करताना एका दगडात किती पक्षी मारले? याची चर्चा सुरु झाली आहे.
रोहितच्या खांद्यावरून विराट कोहलीवर हल्लाबोल केला नाही ना?
गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित हा शतकांसाठी वेडा नसल्याची प्रतिक्रिया दिली. रोहित शतकांसाठी वेडा असता, तर त्याने 40-45 शतके केली असती, पण तो निस्वार्थी असल्याचे गंभीर म्हणाला. त्यामुळे गंभीरने पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावरून विराट कोहलीवर हल्लाबोल केला नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे.
बांगलादेशविरुद्ध कोहलीचे शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध 95 धावांवर बाद झाला होता. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या कोहलीच्या शतकाची चांगलीच चर्चा झाली होती. न्यूझीलंडविरुद्ध कोहलीने धाव टाळून षटकार मारून विजयावर आणि शतकावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुद्धा गंभीर कोहलीवर तुटून पडला होता. विराटला सचिनच्या 49 शतकांची बरोबरी करण्यासाठी अवघ्या एका शतकाची गरज आहे.
दुसरीकडे, हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माची दमदार फलंदाजी सुरु आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये विरोधी संघावर अशाप्रकारे आक्रमण करत आहे की संघ शेवटपर्यंत त्याच्या कहरमधून सावरू शकत नाहीत आणि शेवटी भारतीय संघ विजेता होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माने पुढच्या 4 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकांसह 311 धावा केल्या. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 17 षटकार मारले गेले आहेत, जे या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत.
दुसरीकडे, रोहितची सुरुवातीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आलाह होता. रोहित हा भारतासाठी त्याच्या सुरुवातीच्या 2000 वनडे धावा पूर्ण करणारा चौथा सर्वात संथ फलंदाज होता. तथापि, 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी रोहितच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पाँईंट होता. त्याला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली.
आपण जो रोहित शर्मा पाहत आहोत त्याचे श्रेय धोनीला
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली रोहितने ही संधी दोन्ही हातांनी मिळवली आणि संघातील आपले स्थान पूर्णपणे पक्के केले. भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, आज आपण जो रोहित शर्मा पाहत आहोत त्याचे सर्वात मोठे श्रेय धोनीला जाते. जेव्हा रोहित त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष करत होता तेव्हा त्याला धोनीकडून खूप पाठिंबा मिळाला आणि आता तो ते योग्य सिद्ध करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या