राजकोट: भारत आणि इंग्लंड संघांमधल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या लढाईसाठी राजकोटचं मैदान सज्ज झालं आहे. 9 नोव्हेंबरपासून या कसोटीला सुरूवात होत असून, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नव्या स्टेडियममधला हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळं या लढतीआधी एससीए दोन्ही संघांतील खेळाडूंचा सत्कारही करणार आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीही हजेरी लावतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या कसोटीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. मोदींच्याच हस्ते 2008 साली या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
पूर्णपणे सौरउर्जेचा वापर करणारं हे देशातलं पहिलं स्टेडियम आहे. टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करणारे राजकोटचे सुपुत्र रवींद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा या दोघांची कामगिरी हे राजकोटच्या पहिल्यावहिल्या कसोटीचं विशेष आकर्षण ठरू शकतं.