मुंबई: विराट कोहलीची टीम इंडिया आणि भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन यांनी आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत आपलं स्थान कायम राखलं आहे. आयसीसीच्या कसोटी संघाच्या क्रमवारीत टीम इंडिया 115 गुणांसह आघाडीवर आहे.


विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवून आयसीसी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान भक्कम केलं होतं. भारताच्या या कामगिरीमुळे पाकिस्तान 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावरच्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 118 गुण आहेत.

कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विननेही 900 गुणांसह आपली आघाडी कायम राखली आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन 878 गुणांसह दुसऱ्या, तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 853 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत सर्वोत्तम स्थानावरचा भारतीय हा मान अजिंक्य रहाणेकडेच कायम आहे. तो 825 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी या क्रमवारीत अनुक्रमे चौदावं आणि सोळावं स्थान राखलं आहे.