चौथी कसोटी : इंग्लंडची भारतावर मात, मालिकाही खिशात
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2018 10:12 PM (IST)
इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.
साऊदम्प्टन : चौथ्या कसोटीत इंग्लंडने भारतावर मात केली असून, भारताच्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा संघर्ष अखेर अयशस्वी ठरला आहे. इंग्लंडने साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीसह मालिकाही खिशात घातली आहे. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 184 धावांत गुंडाळून साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीत 60 धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. चौथ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडला दुसऱ्या डावात 271 धावांत रोखलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 245 धावांचं आव्हान होतं. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं. विराट कोहलीनं 58, तर अजिंक्य रहाणेनं 51 धावांची झुंजार खेळी उभारली. भारताच्या अन्य नऊ फलंदाजांनी मिळून 73 धावाच जमवल्या.