पुणे : पुण्यात दहीहंडीच्या सणाला गालबोट लागलंय. दोन दिवसांपूर्वी दहीहंडीच्या बॅनर लावण्यावरुन अक्षय घडसी या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर काल दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून चार जणांनी दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय.

दहीहंडी म्हणजे तरुणांचा आवडता सण. कित्येक दिवस आधीपासून तरुणवर्गाची लगबग पाहायला मिळते. कुठे वर्गणी गोळा करणे, तर कुठे दहीहंडीचे बॅनर लावणे. पुण्यात मात्र या आनंदाला गालबोट लागलंय.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात अक्षय घडसी या तरुणाची परिसरातील पाच-सहा तरुणांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. हत्येच्या या घटनेला एक दिवस उलटत नाही, तोच पुण्यातील आंबेगाव येथे दहीहंडीची वर्गणी न दिल्यामुळे एका सोसायटीमध्ये मित्राच्याच दुचाकीला आग लावण्यात आलीय. वर्गणी न दिल्याचा राग मनात धरुन चार जणांनी  दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली.

याप्रकरणी प्रफुल्ल थोरात याने तक्रार दाखल केली असून, भारती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दत्ता शिंदे, ओकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवले यांना अटक केली आहे. केवळ वर्गणी देण्याला विरोध केल्याने मित्रांनीच आपल्या मित्राची 1 लाख 10 हजार किंमतीची गाडी पेटवून दिल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.