मुंबई : मंत्रालयाच्या नूतनिकरणात बनवण्यात आलेल्या पायऱ्या आता तोडण्यात येणार आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांसारख्याच पायऱ्या मंत्रालयाच्या नव्या बिल्डिंगबाहेर दिखाव्यापोटी बनवण्यात आल्या. मात्र, आता याच पायऱ्या मुंबई पोलिस दलाला सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अग्निशमन दलाला त्यांच्या ऑपरेशन्सच्या दृष्टीनं अडथळा वाटत आहेत.


2012 साली लागलेल्या आगीनंतर मंत्रालयाच्या नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं. त्यासाठी जनतेच्या कररुपी मिळणाऱ्या पैशातून तब्बल 200 कोटी रुपये खर्च झाले. पण एवढा मोठा खर्च करुन या बांधलेल्या पायऱ्या पोलिसांच्या सुरक्षेला धोका ठरत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने या पायऱ्या अग्निशमन दलालाही अडथळ्याच्या ठरत आहेत. पुरातत्व विभागानेही मंत्रालयाबाहेरील या देखण्या पायऱ्यांचा काही उपयोगच नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या पायऱ्या पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानंही हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सरकारने नुसत्या दिखाव्यापोटी जनतेच्या पैशाचा कसा गैरवापर केलाय, हे यातून स्पष्ट होतं आहे.