लीड्स (इंग्लंड): इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने टीम इंडियाचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. इंग्लंडने वन डे सामन्यांची मालिका जिंकून तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.

लीड्सच्या तिसऱ्या वन डेत भारताने इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 44.3 षटकात अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. रशिदने कर्णधार विराट कोहलीसह दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना या महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली.

भारताचा दारुण पराभव, वन डे मालिकाही गमावली

राशिदच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रशिद म्हणाला, “आधी वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर आम्ही आमची भूमिका पार पाडली. मोईन अलीने चांगली गोलंदाजी केली. त्याचा फायदा मलाही झाला. जेव्हा तुम्ही नेट्समध्ये सराव करता, मेहनत घेता, तेव्हा सामन्यात तुम्हाला त्याचा फायदा होतो, आत्मविश्वास उंचावतो”

रशिदने विराट कोहलीची अप्रतिम विकेट घेतली. त्याने कोहलीच्या त्रिफळा उडवल्या. रशिदने टाकलेला चेंडू विराटलाही समजला नाही. कोहली स्वत: अवाक् होऊन बराच वेळ मैदानात तसाच उभा होता.

याबाबत रशिद म्हणाला, “कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराटला आऊट केल्याने आत्मविश्वास मिळतो. आम्ही सर्वांनीच उत्तम गोलंदाजी केली. ही कामगिरी अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करु”