माझा नेल्सन मंडेलांशी थेट संबंध कधीच आला नाही, येण्याचे काहीही कारणच नव्हते. एकतर मी दक्षिण आफ्रिकेत १९९४ सालच्या मार्चमधील निवडणुका संपल्यावर गेलो होतो. नुकताच मंडेलांचा राज्यरोहण समारंभ पार पडला होता. दुसरे कारण म्हणजे मंडेला राहायचे, एकतर जोहान्सबर्ग/प्रिटोरिया किंवा केपटाऊनमध्ये तर मी त्यावेळी पीटरमेरिट्झबर्गमध्ये! देशात मी संपूर्णपणे नव्याने प्रवेश केलेला.
अर्थात नव्या राजवटीचे पडसाद हळूहळू समाजात पसरायला लागले होते. लोकांच्यात नवी स्वप्ने, नवा आनंद दिसून येत होता. एक मात्र नक्की, जरी वंशभेद कायद्यान्वये संपला असला तरी लोकांच्या मनातून गेलेला नव्हता. खरेतर पुढील जवळपास ४-५ वर्षांत तो तसाच राहिला होता.
एके रात्री मी काही मित्रांसमवेत एका हॉटेलात (पूर्वी काळातील गोऱ्या वंशाचे) गेलो असताना, मिळालेली नकारात्मक वागणूक, ही मला चपराकच होती. माझ्या पूर्वीच्या लेखांत त्याबद्दल सविस्तर वर्णन केले असल्याने, इथे पुनरावृत्ती नको. असो, तेव्हा सांगायचा मुद्दा असा, वातावरणात नव्या स्वातंत्र्याचे वारे भरले होते. १९४७ साली, भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हाची परिस्थिती जेव्हा मी वाचली तेव्हा जे मनावर चित्र उमटले होते, त्याचेच तंतोतंत चित्र मला १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत बघायला मिळाले.
सुदैवाने, नेल्सन मंडेला अतिशय व्यवहारी असल्याने, त्यांनी मंत्रिमंडळ तयार करतानाच, पूर्वकालीन गोऱ्या राजवटीतील अनुभवसिद्ध गोऱ्या लोकांना नव्याने सामावून घेतले. ते अर्थातच जरुरीचे होते. कारण काळ्या लोकांना राज्य चालवण्याचा कसलाच अनुभव नव्हता. विशेषत: उपाध्यक्ष म्हणून "डी क्लर्क" यांची नेमणूक केली-ही व्यक्ती पूर्वाश्रमीच्या मंत्रिमंडळात अध्यक्ष होते. इतर अनेक महत्त्वाच्या खात्यांचा अधिभार त्यांनी गोऱ्या लोकांकडेच सोपवला होता. उदारमतवादी धोरणाचे सुरेख उदाहरण म्हणून म्हणायला हवे.
पहिली ३-४ वर्षे तरी देशात कसलाच गोंधळ उडाला नव्हता. वास्तविक पाहाता, इतर आफ्रिकन देशातील अनुभव बघता, दक्षिण आफ्रिकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळणे अशक्य नव्हते. नवीन राजवट आली तरीही अतिशय शांततेने सगळं बदल झाला आणि हळूहळू स्थिरावला गेला आणि याचे सगळे श्रेय नेल्सन मंडेला यांच्याचकडे जाते. जुन्या राजवटीतील मंत्र्यांना देखील तशीच सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली. त्यांच्या खात्यात कधीही फारसा हस्तक्षेप केला नाही. अर्थात सगळेच सुंदर होते, असे नक्कीच म्हणता येणार नाही.
गोऱ्या लोकांचे काही गैरव्यवहार नंतर उघडकीस आले. त्याचीच परिणीती काळ्या लोकांवर झाली आणि हळूहळू भ्रष्टाचार पसरायला लागला. दुर्दैवाने, नेल्सन मंडेलांच्याच काळात, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उभे राहायला लागले होते, इतके की संध्याकाळी ऑफिस वेळ संपल्यावर जोहान्सबर्गमध्ये रस्त्यावरुन पायी हिंडणे अवघड होऊ लागले. हे मंडेलांचे ठळक अपयश म्हणायला हवे. आर्थिक व्यवस्था खालावायला लागली होती. मंडेलांनीच, पुढे "Black Empowerment" कायदा पास केला, त्याचा पाया घातला होता पण त्याचीच कडू फळे तुरळक का होईना दिसायला लागली होती. गोरा समाज आणि काळा समाज, यामधील आर्थिक दरी वाढायला लागली होती आणि समाजात असंतोष वाढायला लागला होता.
वास्तविक पाहाता, आता कुणीही स्थानिक रहिवासी, मनात येईल तिथे घर, कॉलेजमध्ये प्रवेश, हवी तिथे नोकरी इत्यादी सुखसोयी उपभोगायला मुक्त होता पण मुळात आर्थिक चणचण कमालीची असल्याने काळ्या लोकांच्या मनातील उद्रेक अधूनमधून उफाळत होता. स्वातंत्र्य मिळून केवळ ४-५ वर्षेच झाली होती आणि तितक्या काळातच, विशेषतः स्थानिक लोकांच्यात "पूर्वीची राजवट बरी होती" असे मतपरिवर्तन व्हायला लागले होते-जरी उघडपणे व्यक्त होत नसले तरी अनेक घरगुती समारंभात व्यक्त होत असे आणि याचा मी साक्षीदार होतो. हे देखील मंडेलांच्या नावावर अपयश मांडायला हवे.
मुळात काळा समाज हा नेहमीच उग्र स्वभावाचा-कुठे, कधी उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. जे इतर आफ्रिकन देशांत घडत असते त्याचीच छोटी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत क्षीणपणे का होईना व्यक्त होत होती.
मंडेलांना देशाच्या आर्थिक परिस्थितीची वाजवी जाण होती आणि आपली करन्सी मजबूत व्हावी म्हणून त्यांनी अनेक पावले उचलली होती, परंतु हळूहळू ठिगळ पडत होते. एक कारण असे देखील देता येईल, मंत्रिमंडळातील गोऱ्या लोकांनी जितके सहाय्य्य देणे अपेक्षित होते तितके मंडेलांना मिळाले नाही आणि काळ्या लोकांना अनुभव कमीच असल्याने, ती बाजू देखील लंगडीच होती. असे असून देखील त्यांनी तक्रारीचा कुठेही पाढा वाचला नाही किंवा मागील राजवटीला दोष दिला नाही. आज जी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेत आहे, त्याची सुरुवात मंडेलांच्या काळातच सुरु झाली होती. याचे परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षाचा घटत चाललेला पाठिंबा-पण हे घडणारच होते, केवळ लोकांना सुविधा दिल्या म्हणजे परिस्थितीत बदल होतो, हा भाबडा समज फार बोकाळला. माणूस सुधारण्याचे प्रयत्नच झाले नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम फार दूरगामी होतो.
आताचे चित्र यालाच पुष्टी देते. आजच्या परिस्थितीला काही प्रमाणात मंडेला जबाबदार नक्कीच आहेत. सत्ता आल्यावर तिचा वापर करताना काही प्रमाणात तुम्हाला कठोर वागणे क्रमप्राप्तच असते. काळ्या लोकांना तळागाळातून वर आणणे आवश्यकच होते, त्यासाठी त्यांना सुविधा देणे योग्य होते, परंतु त्या सुविधा कितपत परिणामकारक ठरत आहेत, हे तपासण्याची कसलीच यंत्रणा उभी केली नाही-हा भाबडेपणा झाला. केवळ कायदे केले म्हणजे सर्व काही सुव्यवस्थित होईल, हे मानले गेले! याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय कसे राहील? वास्तविक काळा समाज म्हणजे आपला समाज. तेव्हा आपल्या समाजाबाबत मंडेलांना व्यावहारिकदृष्टी दाखवायला हवी होती. आपला समाज कसा आहे? याची समज त्यांना नसणार तर कुणाला असणार. असे असताना देखील, कायदे तयार करणे आणि त्याच कायद्यांची परिणामकारकता तपासणे, याबाबत मंडेला कमी पडले आणि पुढील काळ्या अध्यक्षांनी त्यांचीच "री" ओढली!
असे असले तरी, दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेव्हा सत्तापालट झाला तेव्हा त्या देशाला मंडेलासारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्त्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे.
नेल्सन मंडेला : सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 09:39 AM (IST)
पहिली ३-४ वर्षे तरी देशात कसलाच गोंधळ उडाला नव्हता. वास्तविक पाहाता, इतर आफ्रिकन देशातील अनुभव बघता, दक्षिण आफ्रिकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळणे अशक्य नव्हते. नवीन राजवट आली तरीही अतिशय शांततेने सगळं बदल झाला आणि हळूहळू स्थिरावला गेला आणि याचे सगळे श्रेय नेल्सन मंडेला यांच्याचकडे जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -