LIVE UPDATE :
पंढरपूर : पंढरपूर शहरात दूध वाहतूक करणारा स्वराज दुधाचा टेम्पो आंदोलकांनी फोडला
पालघर : दूध आंदोलनाचा धसका घेत सरकारकडून राजू शेट्टींना चर्चेचं निमंत्रण आलं आहे. पालघरमध्ये तळ ठोकून बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठवलं आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी दिलेल्या उद्याच्या चक्का जाम आंदोलनाचा धसका सरकारने घेतला आहे.
रात्री होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता झाली तरी उद्याचं चक्का जाम आंदोलन होणारच असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. आहे. 20 तारखेला होणाऱ्या अविश्वास ठरावा वेळीही दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
नागपूर : शांतपणे दूध आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, पण हिंसक आंदोलकांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
पुणे : अमूलचं दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी : राज ठाकरे
पालघर : अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर रोखण्यासाठी खासदार राजू शेट्टी डहाणू स्थानकावर दाखल
नाशिक : दूध आंदोलनाचा नाशिकच्या दूध व्यावसायिकांना मोठा फटका, भीतीपोटी दूध शहराबाहेर नेण्यास वाहतूकदारांचा नकार, याचा फटका म्हणून दुधाच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची घसरण. नाशिकच्या मुख्य दूध बाजारातून रोज शिर्डी, येवला आणि कोपरगावकडे 3 हजार लिटर दूध जाते.
वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत कंटेनर आणि दुधाच्या टेम्पोचा अपघात झाला. वसईच्या सातीवली फाटा येथे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईच्या लेनवर कंटेनर डिव्हायडरवर आदळून अपघात झाला होता. पाठीमागून येणारा दुधाचा टेम्पो त्याच्यावर जाऊन आदळल्याने त्याचाही अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर टेम्पोतील दुधाच्या पिशव्या रसत्यावर पडल्या. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल असून, दोन्ही वाहनांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
पुण्यात कात्रज दूध संघाच्या 50 टक्के संकलनावर परिणाम, आज दुपारनंतर दुधाची कमतरता जाणवण्याची शक्यता. दोन-तीन दिवसात कात्रज संघाने दुग्धजन्य पदार्थ बनवलेले नाहीत. कात्रज दूध संघाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध आंदोलन आणखी तीव्र होणार, उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार, तसंच मुलं-बाळं, महिलांना घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन बसणार, खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरुच ठेवलं आहे. त्यासाठी विविध ठिकाणी दुधाचे टँकर अडवून दूध कोंडी करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे.
मुंबईत तिसऱ्या दिवशी दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. अनेक ठिकाणी दुकानांत विक्रीसाठी दूध उपलब्ध आहे. मात्र पुणेकरांना आज दूध कमी पडण्याची शक्यता आहे. चितळेंचं दूध संकलन गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. पुण्याकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या अडवल्या जात आहेत. त्यामुळे आज पुणेकरांना दुधाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
राजू शेट्टी पालघरमध्ये
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी पालघर जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. काल सकाळपासून त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी चेकपोस्ट येथून गुजरातमधून एकही दुधाचा टँकर मुंबईत येऊ दिला नाही. मात्र दूध रेल्वेने मुंबईत आणण्याचा निर्णय झाल्याने राजू शेट्टी यांनी डहाणू रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी 10.30 वाजता रेलरोकोचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
जालना - स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जालना-औरंगबाद रोडवर नागेवाडी येथे सकाळी 6 वाजाता दुधाचा 4 हजारचा लीटरचा ट्रँकर अडवून दूध रस्त्यावर ओतलं.
कोल्हापूर - जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकूळ दूध संघाचा टँकर आंदोलकांनी पेटवला. तसेच जयसिंगपूर जनतारा हायस्कूलजवळ 20 कॅन दूध रस्त्यावर ओतलं.
पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील बेगमपुरातील नेचर डिलायटचे दूध संकलन केंद्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडून 20 हजार लीटर दुधाच्या टाक्या रिकाम्या केल्या.
बीड - पाली गावात दुधाचा टँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला. टँकरमधील जवळपास 20 हजार लीटर दूध रस्त्यावर ओतून दिलं.
सातारा - खंबाटकी घाटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर आणि एक एसटी फोडली आहे. जयसिंगपूरहून पोलीस संरक्षणात हा टँकर निघाला होता.
आंदोलनावर तोडग्यासाठी दिल्ली, नागपूरमध्ये बैठका निष्फळ
दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही.
दिल्लीतील बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. तर कालच नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीयांची बैठक झाली. या बैठकीतही कोणताही निर्णय आला नाही.