साऊदम्प्टन : भारताच्या चेतेश्वर पुजारानं साऊदम्प्टन कसोटीत झुंजार शतक झळकावलं आहे. त्याच्या या शतकानं टीम इंडियाला पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळवून दिली. या कसोटीत भारताचा पहिला डाव 273 धावांत आटोपला आहे. इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद सहा धावा केल्या.


पुजारानं 257 चेंडूंत 16 चौकारांसह नाबाद 132 धावांची खेळी रचून भारताच्या पहिल्या डावाची भक्कम उभारणी केली. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे 15वं शतक ठरलं. पुजारानं कोहलीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली.


विराट कोहलीनं सहा चौकारांसह 46 धावांचं योगदान दिलं. पुजारा आणि जसप्रीत बुमरानं अखेरच्या विकेटसाठी रचलेली 46 धावांची भागीदारीही भारताच्या डावात महत्त्वाची ठरली. इंग्लंडकडून मोईन अलीनं पाच फलंदाजांना माघारी धाडलं. स्टुअर्ट ब्रॉडनं दोन तर सॅम करन आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


विराटच्या कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या.या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला.