जकार्ता : इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियाडच्या तेराव्या दिवशी भारताच्या खात्यात दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर पडली आहे. हॉकीत भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिला हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतानं जपानकडून 1-2 अशी हार स्वीकारली.


सेलिंग प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं
भारतानं सेलिंग प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. महिलांच्या फोर्टी नाईन ईआर एफएक्स शर्यतीत भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगार यांनी रौप्यपदकाची कमाई केली. त्या दोघींनी पंधरा शर्यतींअखेर दुसऱ्या क्रमांकाच्या 40 गुणांची नोंद केली.


महिलांच्या ओपन लेसर 4.7 प्रकारात भारताची हर्षिता तोमर कांस्यपदकाची मानकरी ठरली. हर्षितानं बारा शर्यतींअखेर 62 गुणांची वसुली करून तिसऱ्या स्थानावर आली. पुरुषांच्या फोर्टी नाईन ईआर प्रकारात वरुण अशोक ठक्कर आणि सी. के. गणपती यांनी भारताच्या खात्यात कांस्यपदकाची भर घातली. त्या दोघांनी पंधरा शर्यतींअखेर तिसऱ्या क्रमांकाच्या 53 गुणांची कमाई केली.


पुरुषांना स्क्वॉश प्रकारात कांस्य
पुरुषांच्या स्क्वॉश प्रकारात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारतानं हाँगकाँगकडून 0-2 अशी हार स्वीकारली. या लढतीत भारताला हाँगकाँगच्या तोडीची कामगिरी बजावता आली नाही. भारतीय पुरुषांच्या कांस्यविजेत्या चमूत सौरव घोषाल, हरिंदरपालसिंग संधू, रमित टंडन आणि महेश माणगावकरचा समावेश आहे.


बॉक्सर विकास कृष्णन कांस्य पदक
बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे एशियाडच्या कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. विकास कृष्णनच्या डाव्या पापणीच्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीयदृष्ट्या अनफिट घोषित करण्यात आलं. परिणामी विकास कृष्णन 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत खेळू शकला नाही. या कामगिरीनं विकास कृष्णनच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद झाली. सलग तीन एशियाडमध्ये पदकांची कमाई करणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. त्यानं 2010 सालच्या एशियाडमध्ये लाईटवेट गटाच्या सुवर्णपदकाची, तर 2014 सालच्या एशियाडमध्ये मिडलवेट गटाच्या कांस्यपदकाची कमाई केली होती.


स्क्वॉशमध्ये महिलांची अंतिम फेरीत धडक
भारतीय महिलांनी गतविजेत्या मलेशियाचा २-० असा पराभव करून, एशियाडमधल्या स्क्वॉशच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत भारतीय महिलांचा सामना हाँगकाँगशी होईल. या कामगिरीनं महिलांच्या स्क्वॉश प्रकारात भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे. भारताच्या या चारसदस्यीय चमूत जोश्ना चिनाप्पा, दीपिका पल्लिकल, सुनयना कुरुविला आणि तन्वी खन्ना यांचा समावेश आहे.


बॉक्सर अमित पंघाल अंतिम फेरीत
भारताचा बॉक्सर अमित पंघालनं एशियाडच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे अमितकडून भारताला किमान रौप्यपदकाची अपेक्षा करता येईल. इंडोनेशियातल्या एशियाडची फायनल गाठणारा तो भारताचा एकमेव बॉक्सर ठरला. मूळचा हरयाणाचा अमित पंघाल हा सेनादलाच्या सेवेत आहे. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं रौप्यपदकाची कमाई केली होती.