बर्मिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या सत्रात प्रभावी कामगिरी बजावली आहे. या कामगिरीमुळे एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा डाव पहिल्या दिवसअखेर नऊ बाद 285 असा गडगडला. कर्णधार ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टोनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 104 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडला चार बाद 216 धावांची मजल मारून दिली होती.
मात्र ज्यो रूट धावचीत झाला आणि इंग्लंडचा डाव कोसळला. भारताच्या रवीचंद्रन अश्विननं चार फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडच्या धावसंख्येला वेसण घातली. मोहम्मद शमीनं दोन आणि उमेश यादवनं एक विकेट घेऊन त्याला उत्तम साथ दिली.
एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या डावाला आकार देण्यात कर्णधार ज्यो रूटनं मोलाची भूमिका बजावली. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कूक स्वस्तात माघारी परतला. पण रूटनं किटन जेनिंग्सच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची आणि जॉनी बेअरस्टोच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला.
रूटनं 156 चेंडूंत नऊ चौकारांनी 80 धावांची खेळी सजवली. जॉनी बेअरस्टोनं नऊ चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. सॅम क्युरॉन आणि जेम्स अँडरसन ही शेवटची जोडी सध्या क्रिजवर टिकून आहेत. त्यामुळे उद्या इंग्लंडच्या धावसंख्येत आणखी किती भर पडते, हे पाहावं लागणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला.
विराट कोहलीने आज जो संघ मैदानात उतरवला आहे, त्यामध्ये आश्चर्यकारक बदल करण्यात आले आहेत.
मधल्या फळीचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी के एल राहुलला संधी मिळाली आहे. तर इंग्लंड फलंदाजांना धडकी भरवणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवही बाहेर बसला आहे. आर अश्विन फिरकीची धुरा सांभाळणार आहे.
या सामन्यात कोहलीने हार्दिक पंड्यासह अन्य तीन मध्यमगती गोलंदाजांना मैदानात उतरवलं आहे. यामध्ये उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांचा समावेश आहे.
एकंदरीत कोहलीने 5 फलंदाज, 1 विकेट, अष्टपैलू हार्दिक पंड्या, आणि चार गोलंदाजांना घेऊन इंग्लंडला सामोरं जाणं पसंत केलं आहे.
भारतीय संघ: मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा
भारताची लढाई
गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळेच विराटची टीम इंडिया इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. 2014 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली होती. तर वन डेत इंग्लंड संघाची 2-1 अशी सरशी झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेच्या निमित्तानं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही फौजा आता सज्ज झाल्या आहेत.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर. पण इंग्लंडची मायदेशातली कामगिरी भारताच्या तुलनेत नेहमच वरचढ राहिलीये. त्यामुळे या दोन्ही संघांमधली पाच कसोटी सामन्यांची मालिका तितक्याच तुंबळपणे लढली जाईल.
संबंधित बातमी
भारत अकरा वर्षानंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज
भारताची इंग्लंडविरुद्ध ‘कसोटी’, इतिहास काय सांगतो?
विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी
भारत कसोटी मालिका जिंकणार नाही, दोन भारतीय खेळाडूंची भविष्यवाणी