मुंबई : बॉलिवूडची बेबीडॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिक वेब सीरिजवरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अनेकजण आक्षेपही घेत आहेत. मात्र या सर्वांना सनी लिओनीने मिड डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून उत्तरं दिली आहेत.


बायोपिकमध्ये स्वत:च का काम केलं, याचे उत्तर देताना सनी लिओनी म्हणाली, “नमाह फिल्म्सचे शरीन मंत्री आणि माझे पती डॅनियल वेबर यांनी मला या सीरिजबद्दल सांगितलं. मात्र आयुष्यातल्या जुन्या गोष्टींवर काम करण्यास मी तयार नव्हते. मात्र या दोघांनीही मला या सीरिजचा उद्देश नीट समजावून सांगितला.”

प्रतिमा निर्मितीसाठी अशा प्रकारची डॉक्युमेंट्री केलीय का, असे सनी लिओनीला विचारले असता, ती म्हणाली, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, हे मला नाही माहित. मात्र या सिनेमात सत्य दाखवलं आहे.”

“या वेब सीरिजचं शूटिंग माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं. दुसऱ्या सीझनने तर मी अधिकच तणावात होते. त्यातून अद्याप बाहेर पडले नाही.”, असेही सनी लिओनीने सांगितले.

“मी माझ्याच आयुष्याच्या दुसऱ्या पैलूला पाहत होती आणि त्याबद्दल विचार करुन रडायला येत होतं. मला माझं आयुष्य माहित आहे. मी आयुष्यात कसे निर्णय घेतले, याबद्दलही मला माहिती आहे. मात्र तेव्हा मी मानसिकदृष्ट्या प्रगल्भ नव्हती, तेव्हा मी विचार केला नव्हता, की या सर्व निर्णयांचा पुढे कुटुंब आणि नातेवाईकांवर काय परिणाम होईल.” असेही सनी लिओनीने नमूद केले.

दरम्यान, सनी लिओनीवरील वेब सीरिज सध्या सोशल मीडियासह सर्वत्र चर्चेचा विषय आहे. काहींचे आक्षेप आणि प्रश्न असले, तरी अनेकांनी या वेब सीरिजचं कौतुकही केले आहे.