बाऊंड्री लाईनवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप-मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीरी मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली. पृथ्वी शॉ वेदनेने कळवळत होता. यानंतर भारतीय संघाचा मेडिकल स्टाफ तातडीने तिथे पोहोचला. प्राथमिक उपाचरानंतर शॉच्या दुखापत काहीच सुधारणा न झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेलं.
पृथ्वीच्या या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली आहे. एकीकडे टीम इंडिया आधीपासूनच सलामीच्या फलंदाजांमुळे चिंताग्रस्त आहे. त्यातच आता पृथ्वीलाही दुखापत झाली आहे. दरम्यान, अपेक्षा अजूनही संपलेल्या नाही. संघ व्यवस्थापन पृथ्वी शॉच्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅन रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. परंतु आता अॅडलेड कसोटीत त्याच्या समावेशाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जर पृथ्वी शॉ अॅडिलेडमध्ये खेळू शकला नाही तर टीम इंडियासाठी हा मोठा झटका असेल.