कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आज भारताची बांगलादेशविरुद्ध लढत होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने जिंकून भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे.
आज बांगलादेशला हरवून मालिकेची फायनल गाठण्याची भारताला संधी असणार आहे. तर मालिकेतील आव्हान मजबूत करण्यासाठी बांगलादेशाला हा सामना जिंकणं गरजेच आहे.
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा फारशी चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म ही भारतीय संघाची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी रोहित शर्मा आपला फॉर्म परत मिळवेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
पण बांगलादेशने आपल्या मागील सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशसमोर 215 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण मुशफकीर रहीमच्या 72 धावांच्या जोरावर बांगलादेशने हे आव्हान दोन चेंडू आणि पाच विकेट राखून पार केलं. या विजयामुळे सध्या बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्यांना कमी लेखण्याची चूक करता येणार नाही.