महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन 15 महिलांना गंडा
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 03:04 PM (IST)
धुळ्याचा रहिवासी असलेल्या भिकन नामदेव पालांडेने महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन 15 महिलांना गंडा घातला
मुंबई : महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन महिलांना गंडा घालणाऱ्या 37 वर्षीय पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या भावासोबत लग्न करुन देण्याचं आश्वासन देऊन त्याने अनेक जणींकडून पैसे, दागिने उकळले होते. धुळ्याचा रहिवासी असलेला भिकन नामदेव पालांडे यांचं लग्न झालेलं असून त्याला दोन मुलंही आहेत. मुंबईत सहा पोलिस ठाण्यांमध्ये जवळपास 15 महिलांनी पालांडेविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. भिकन मुख्यत्वे विधवा महिलांना हेरायचा. फेसबुकवर महिलेच्या नावे तयार केलेल्या फेक अकाऊण्टवरुन तो महिलांशी मैत्री करायचा. आपल्या भावासोबत लग्न करुन देण्याचं आमिष तो दाखवत असे. 'माझ्या भावाला घटस्फोटासाठी पैशांची गरज आहे' असं बतावणी करुन तो संबंधित महिलांकडून पैसे उकळायचा.