नागपूर : यजमान भारत आणि बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यांत टीम इंडियाने 30 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यर (33 चेंडूत 62) आणि लोकेश राहुल (35 चेंडूत 52) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 174 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 144 धावांवर आटोपला.
दीपक चहरने आज त्याच्या टी-20 कारकिर्दीतली पहिली हॅट्ट्रिक घेतली. दीपकने 3.2 षटकांत अवघ्या 7 धावा देत बांगलादेशचे 6 गडी बाद केले. तर शिवम दुबेने 4 षटकात 30 धावा देत 3 गडी बाद केले. यजुवेंद्र चहलनेदेखील एक बळी मिळवला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन आज अपयशी ठरले. पंरतु राहुल-अय्यर जोडीने भारताचा डाव सावरला. बांगलादेशकडून शफीउल इस्लाम आणि सौम्य सरकारने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
174 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला चांगलाच समाचार घेतला. नइमने 48 चेंडूत 81 धावा चोपल्या. तर मिथूनने 27 धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांनी फारवेळ मैदानात टिकू दिले नाही.
दरम्यान, दीपक चहरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.