Smirti Mandhana : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं विक्रम केला आहे. ती पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची स्थिती मजबूत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये (India vs Australia) सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारतानं आतापर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.


यात स्मृतीच्या (Smriti Mandhana) शतकाचा समावेश आहे.  स्मृती मानधानने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी  एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या. भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मानं 93 धावांची दमदार सलामी दिली. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊत सोबत स्मृती मानधनानं भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत 55 षटकात भारतानं स्मृती नाबाद 102 आणि पूनम राऊत 19 धावांवर खेळत आहे.


काल ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीला सुरुवात झाली. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येत असलेल्या या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर आश्वासक सुरुवात केली. खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी अवघ्या 44.1 षटकांचा खेळ झाला. पण तोपर्यंत भारताने एक बाद 132 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा स्मृती 15 चौकार आणि एका षटकारासह 80 धावांवर तर पूनम राऊत 16 धावांवर खेळत होती. 


क्विन्सलँडच्या करारा ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने आज नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण स्मृती आणि शफालीनं ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा नेटानं सामना केला. शफालीनं आपल्या आक्रमकतेला लगाम घालत खेळ केला. तिला तीन वेळा जीवदानही मिळालं. पण 31 धावांवर सोफी मॉनिल्यूक्सच्या चेंडूवर एक खराब फटका खेळण्याच्या नादात ती झेलबाद झाली. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊतनं स्मृतीला चांगली साथ दिली.  


दरम्यान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 9 ते 12 नोव्हेंबर 2017 साली पहिला डे-नाईट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता.