अंडर-19 विश्वचषक : टीम इंडियाने चौथ्यांदा वर्ल्डकप पटकावला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2018 07:34 AM (IST)
अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं.
माऊंट मॉन्गानुई/ न्यूझीलंड : अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतनं 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद पण मनजोत कालराने संयमी खेळी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. उपांत्य सामन्यात शतक झळकावणारा शुबमन गिलने देखील मनजोतला चांगली साथ दिली. पण तो 31 धावांवर परम उपलचा बळी ठरला. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 216 धावाच करता आल्या. जोनाथन मेर्लोच्या ७६ धावांच्या झुंजार खेळी सोडल्यास इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या सामन्यात संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं. भारताच्या ईशान पोरेल, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय आणि शिवा सिंगनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर शिवम मावीनं एक बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.