'पद्मावत' सुरु असताना थिएटरमध्ये तरुणीवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2018 11:41 PM (IST)
23 वर्षीय आरोपीशी पीडित तरुणीची ओळख दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती.
हैदराबाद : 'पद्मावत' चित्रपट सुरु असताना 19 वर्षीय तरुणीवर थिएटरमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर बॉयफ्रेण्ड झालेल्या तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप सिकंदराबादेतील पीडितेने केला आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेली घटना गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सिनेमा हॉल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची पोलिसांची तयारी आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. 23 वर्षीय आरोपीशी पीडित तरुणीची ओळख दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती. 20 दिवसांपूर्वी दोघं सिकंदराबाद रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर दोघं आरोपीच्या बहिणीच्या घरी गेले. 21 जानेवारीला ते पुन्हा हैदराबादमध्ये भेटले. तेव्हा आरोपीने पीडितेला त्याच हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. त्यानंतर दोघांनी इंदिरा पार्कमध्ये काही काळ एकत्र घालवला. तीन दिवसांपूर्वी सिकंदराबादमधील प्रशांत थिएटरमध्ये ते पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दोघं बसले होते, त्याच्या आजूबाजूच्या सीट्स रिकाम्या होत्या. या संधीचा फायदा घेत सिनेमा सुरु असतानाच त्याने बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.