मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली तिसरी वन डे आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाला ही वन डे जिंकून पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची उत्तम संधी आहे.


LIVE UPDATE : इंदूरमधील तिसरी वनडे- नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

कुलदीप यादवनं घेतलेली हॅटट्रिक कोलकात्याच्या वन डेमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारत दौऱ्यात मनगटी फिरकीला सामोरं जाताना प्रचंड दडपणाखाली आहेत, हे कुलदीपच्या या हॅटट्रिकनं ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा दाखवून दिलं.

कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 253 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 32 षटकांत 5 बाद 148 धावांची मजल मारली होती. पण 33 व्या षटकात कुलदीप यादवनं मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडलं आणि सामना भारताच्या बाजूनं झुकवला.

कुलदीप यादवच्या हॅटट्रिकला दुसऱ्या एंडनं यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारकडून लाभलेली साथ कांगारुंना आणखी कोंडीत पकडणारी ठरली.

एकंदरीत, चेन्नईपाठोपाठ कोलकात्याच्या वन डेतही भारतीय गोलंदाजांचं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर निर्विवाद वर्चस्व दिसून आलं.

कुलदीप यादव... दोन सामन्यांमध्ये 87 धावांत पाच विकेट्स. सर्वोत्तम 54 धावांत तीन विकेट्स

यजुवेंद्र चहल... दोन सामन्यांमध्ये 64 धावांत पाच विकेट्स. सर्वोत्तम 30 धावांत तीन विकेट्स.

भुवनेश्वर कुमार... दोन सामन्यांमध्ये 34 धावांत चार विकेट्स. सर्वोत्तम नऊ धावांत तीन विकेट्स.

हार्दिक पंड्या... दोन सामन्यांमध्ये 84 धावांत चार विकेट्स. सर्वोत्तम 28 धावांत दोन विकेट्स.

कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलची मनगटी फिरकी असेल किंवा भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याचा वेगवान मारा... पहिल्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये भारताचं आक्रमण हीच कांगारुंची मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे तिसऱ्या वन डेसाठी इंदूरच्या मैदानात उतरण्याआधी कांगारुंना या डोकेदुखीवरचा इलाज शोधावा लागणार आहे. अन्यथा विराट कोहलीच्या टीम इंडियाला तिसऱ्या वन डेसह पाच सामन्यांची मालिकाही खिशात घालण्यापासून रोखणं कठीण आहे.