India vs Australia T20: टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत बाजी मारली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरलेल्या चहलनंही 3 फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंमुळे टीम इंडियाला 20 षटकात 7 बाद 161 धावांची मजल मारता आली. राहुलनं 40 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजानं 23 चेंडूत नाबाद 44 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॉईझेस हेन्रिक्सनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मिचेल स्टार्कनं दोन विकेट्स घेतल्या.


युजवेंद्र चहल भारताचा पहिला Concussion सबस्टिट्यूट

टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 11 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं मोलाची भूमिका बजावली. पण महत्वाची बाब अशी की सामन्याच्या सुरुवातीला अंतिम अकरामध्ये युजवेंद्र चहलचा समावेश नव्हता. पण Concussion (कन्कशन) सबस्टिट्यूट या आयसीसीच्या नव्या नियमानुसार चहल दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरला. आणि त्यानं पूर्ण चार षटकं गोलंदाजीही केली आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

जाडेजाला दुखापत, चहल मैदानात


भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात मिचेल स्टार्कचा उसळता चेंडूत फलंदाजी करणाऱ्या रविंद्र जाडेजाच्या डोक्याला लागला. त्य़ामुळे जाडेजाला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर जाता आलं नाही. त्यामुळे Concussion सबस्टिट्यूट नियमानुसार कर्णधार विराट कोहलीनं युजवेंद्र चहलला मैदानात उतरवलं. हा नियम लागू झाल्यापासून युजवेंद्र चहल हा Concussion सबस्टिट्यूट म्हणून खेळणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.