मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतलं 12 वं शतक झळकावत टीम इंडियाला मोठ्या आघाडीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अजिंक्यला दुसऱ्या दिवशी हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांनी साथ दिली. रहाणेनं जाडेजासोबत शतकी भागीदारी केली. पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी रहाणे 104 तर जाडेजा 40 धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या डावात आतापर्यंत 82 धावांची आघाडी घेतली आहे.


आजच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. त्यानंतर पुजारा 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेने हनुमा विहारी (21), ऋषभ पंत (29) यांच्यासोबत छोट्या भागीदाऱ्या करत संघाला सुस्थितीत नेले. पंत बाद झाल्यानंतर आलेल्या जाडेजाने रहाणेला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, कमिन्सने दोन-दोन तर लायनने एक विकेट घेतली.


पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली होती. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. बुमराहला रविचंद्रन अश्विन आणि पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजनं चांगली साथ दिली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मयांक अगरवालच्या रुपात धक्का बसला होता. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.


सलामीवीर बर्न्स शून्यावर बुमराहचा शिकार ठरला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशनेनं सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर हेडनं 38 तर वाडेनं 30 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून बुमराहनं चार, अश्विननं 3, सिराजनं 2 तर रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली. टीम इंडिया दुसऱ्या कसोटी समान्यात विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.