India vs Australia 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 2024-25 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा येथे सुरू आहे. आज (17 डिसेंबर) गाबा कसोटीचा चौथा दिवस भारताचे शेपूट फलंदाज आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावावर राहिला. भारतीय संघाची धावसंख्या चौथ्या दिवसअखेर 252/9 अशी आहे. आकाश दीप (27) आणि जसप्रीत बुमराह (10) क्रीजवर उभे आहेत. दोघांमध्ये 39 धावांची भागीदारी झाली आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला 246 धावा करायच्या होत्या, ते आकाश दीपने चौकार मारून वाचवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. आता गाब्बा कसोटीच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजीसाठी उतरावे लागणार आहे.
भारताचे धुरंदर पुन्हा अपयशी
तिसऱ्या कसोटीत भारताचे धुरंदर पुन्हा एकदा अपयशी ठरले. जैस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. गिल आणि कोहली अनुक्रमे 1 आणि 3 धावांवर बाद झाले. पंत 9 धावांवर बाद झाला, तर रोहित शर्माही 10 धावांवर बाद झाला. मात्र, आकाश दीपने 11व्या क्रमांकावर नाबाद 27 धावांची खेळी करत संघाची लाज राखली. तिसऱ्या कसोटी 11व्या क्रमांकावरील आकाशदीपच्या 27 धावा निर्णायक ठरल्या असून भारतावरील फाॅलोऑनची नामुष्की टळली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सने भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले. मिचेल स्टार्कला 3, जोश हेझलवूड आणि नॅथन लायनला प्रत्येकी 1 यश मिळाले
भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी
पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. दुसऱ्याच चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालची (4 धावा) विकेट गमावली. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर फ्लिक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वीला मिचेल मार्शने झेलबाद केले. त्यानंतर स्टार्कने त्याच्या पुढच्याच षटकात शुभमन गिललाही (1 धावा) बाद केले. मार्शने शुभमन गिलचाही झेल घेतला. विराट कोहलीकडून चांगल्या खेळाच्या अपेक्षा होत्या, मात्र जोश हेझलवूडच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद झाला. कोहलीने 16 चेंडूंचा सामना करत 3 धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत (9 धावा)ही संघातून बाहेर पडला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर पंत यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद झाला. पंत बाद झाल्यानंतर पाऊस पडला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी फारसा खेळ होऊ शकला नाही.
चौथ्या दिवशी रोहित शर्मा चांगला खेळेल अशी अपेक्षा होती मात्र तो स्वस्तात बाद झाला. रोहितला विरोधी कर्णधार पॅट कमिन्सने यष्टिरक्षक कॅरीच्या हाती झेलबाद केले. रोहितने 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करत भारताचा ताबा घेतला. राहुलने 139 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. राहुल स्टीव्ह स्मिथच्या हाती नॅथन लायनवी झेलबाद झाला. यानंतर नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून 53 धावांची भागीदारी केली, पण टीम इंडियाच्या 194 धावांवर चेंडू नितीशच्या बॅटला लागला आणि विकेटमध्ये गेला. अशाप्रकारे भारतीय संघाला सातवा धक्का बसला. काही वेळाने स्टार्कच्या चेंडूवर सिराज (१२)ही यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद झाला. रवींद्र जडेजा (77) बाद होणारा नववा फलंदाज ठरला.
इतर महत्वाच्या बातम्या