रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी सनसनाटी पराभव केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. नागपूरमधल्या त्या दमदार विजयानंतर विराट कोहली आणि त्याचे शिलेदार मालिकेतल्या रांचीमधील तिसऱ्या वन डेसाठी सज्ज झाले आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली तिसरी वन डे आज रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी  कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतली ही रांचीमधली अखेरची वन डे असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे साहजिकच या सामन्यात भारतीय क्रिकेटरसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा धोनीच राहणार आहे.

भारतीय संघाला आघाडीच्या फलंदाजांची चिंता तीव्रतेने भेडसावत आहे. भारताचे दोन्ही विजय हे निसटते आहेत. पहिल्या सामन्यात सहा गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात आठ धावांनी भारताने विजय मिळवला. त्यामुळेचं रांचीमधील तिसरी वन डे जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

तिसऱ्या वनडे सामन्यात भुवनेश्वर आणि ऋषभ पंतची एंट्री होणार?

रांचीमधील सामन्यात भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळू शकते.

गुरुवारी मोठ्या कालावधीनंतर भुवी (भुवनेश्वर कुमार) संघासोबत सराव करताना पाहायला मिळाले. भुवनेश्वरने दिवसभर गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात जसप्रीत बुमराहऐवजी भुवनेश्वरला संधी मिळू शकते.

भुवीसोबत ऋषभ पंतही यावेळी सराव करताना पाहायला मिळाला, तिसऱ्या वनडेमध्ये पंतदेखील खेळू शकेल. परंतु पंतला कोणाच्या जागी संघात घेतले जाईल, हा प्रश्नच आहे. विश्वचषकापूर्वीची शेवटची एकदिवसीय मालिका असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी पंत आणि भुवीला संधी मिळू शकते.

मालिकेवर निवडसमितीचं लक्ष

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाआधीची टीम इंडियाची ही शेवटची वन डे मालिका आहे. त्यामुळे साहाजिकच टीम इंडियाच्या शिलेदारांच्या कामगिरीकडे भारतीय निवडसमितीचं लक्ष लागून राहिलं आहे.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वाजतापासून