ऑस्ट्रेलियाला हरवलं ऑस्ट्रेलियात...

त्यानंतर न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये लोळवलं...

आणि आता विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज झाली आहे कांगारुंविरुद्धच्या आणखी एका आव्हानासाठी...

भारत आणि ऑस्ट्रेलियन फौजा तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे ते उभय संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेचं. या मालिकेतली पहिली लढत आज संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणमच्या मैदानात रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यात दोन ट्वेन्टी 20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही अखेरची संधी आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला वन डेत 2-1 असं हरवलं होतं. मग रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये 4-1 असा धुव्वा उडवला होता. आता मायदेशातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेतही टीम इंडियाच्याच वर्चस्वाची अपेक्षा आहे.

आयसीसीच्या ट्वेन्टी 20 आणि वन डे क्रमवारीतही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी ट्वेन्टीत पाचव्या तर वन डे क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. क्रमवारीतली ही तफावत आणि भारताची ट्वेन्टी ट्वेन्टीतली सध्याची ताकद पाहता या मालिकेतही भारतंच वर्चस्व गाजवेल अशी आशा आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा या मालिकेच्या निमित्ताने ट्वेन्टी ट्वेन्टीत पुनरागमन करणार आहेत. वन डे संघात स्थान न मिळालेल्या दिनेश कार्तिकसाठीही विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेतली कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवनसह रिषभ पंत आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनीची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजवर 18 ट्वेन्टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात अकरा वेळा भारताने तर सहा वेळा कांगारुंनी बाजी मारली आहे. याशिवाय टीम इंडियाची कांगारुंविरुद्ध मायदेशातली कामगिरी ही नेहमीच वरचढ राहिली आहे. त्यामुळे आगामी मालिकेतही हीच परंपरा कायम राखण्याचा विराट आणि त्याच्या शिलेदारांचा प्रयत्न राहिल.

असा असेल संघ!

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि मयांक मार्कंडेय.

आस्ट्रेलिया : अॅरॉन फिन्च (कर्णधार), डार्सी शार्ट, पॅट कमिन्स, अॅलेक्स कारे, जेसन बेहरेनडोर्फ, नॅथन कूल्टर नाईल, पीटर हॅण्डकोंब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, जाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोयनिस, अॅशटन टर्नर आणि अॅडम जम्पा.