पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रात्री उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर जीआय एन्डोस्कोपी करुन 48 तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.


मुख्यमंत्र्यांना गोमेकॉत दाखल केल्याचे समजताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत धाव घेत पर्रिकर यांच्या तब्येतीची चौकशी केली. पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी पर्रिकर यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

राणे म्हणाले, आपण पर्रिकर यांच्याशी बोललो. पर्रिकर यांच्यावर कोणतीही सर्जरी किंवा एन्डोस्कोपी झालेली नाही. नियमित तपासणीसाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. पर्रिकर यांनी आपल्याला घरी जायला सांगितले असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो."


दोन दिवसांपूर्वी पर्रिकर यांची प्रकृती काहीशी बिघडली होती. काही काळ त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. 22 फेब्रुवारीला त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन 26 फाइल्स क्लिअर केल्या होत्या. काल  सायंकाळी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन मडगावमधील विकास कामांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असल्याचा निर्वाळा सरदेसाई यांनी दिला होता. त्याला काही तास उलटायच्या आतच पर्रिकर यांना गोमेकॉमध्ये दाखल करावे लागले.

62 वर्षीय मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग आहे. याआधी त्यांच्यावर गोवा, मुंबई, न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार झाले आहेत. महिनाभरापूर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.