बीड : परळीमध्ये आज महाआघाडीची दुसरी सभा पार पडली. या सभेत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. पंकजा यांच्या विधानाचा आधार घेत राष्ट्रवादीला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, असा टोला धनंजय यांनी लगावला.


मुख्यमंत्र्यांच्या जामिनासंदर्भातील विधानावर बोलताना छगन भुजबळ यांनी आपण सिंहासारखं जगतो. आपण घाबरणारे नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सरकारवर टीका केली.


शरद पवार


लवकरच वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यावरून राजकारण सुरु केलं जात आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसरकर यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास बंदी घालू नये, असं म्हटले तर त्यांच्यावर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा आरोप सुरु केला असल्याचं शरद पवार म्हणाले.


राज्यात दुष्काळ आहे, गुरे उपाशी आहेत. पिके करपली आहेत. बीड जिल्ह्यातून जनावरे बाहेर जात आहेत. इथे एकही छावणी सुरू केली नाही. कुठेही शेतकर्‍याला मदत नाही. आम्ही छावणी सुरु करुन जनावरे जगवली. या सरकारला घालवू हा विश्वास परिवर्तन मेळावा सभेतून देतो, असा विश्‍वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे


राष्ट्रवादी संपवणे चिक्की खाण्याएवढे सोपे नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. मुख्यमंत्री काल परळीत आले होते. परळीच्या आमच्या सभेवर टीका केली. मात्र लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून महाआघाडीचा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.


बीडच्या दबंग खासदारांसमोर राष्ट्रवादीला उमेदवार सापडत नाहीत, अशी टीका भाजपचे लोक करत आहेत. बीडच्या खासदारांचा राजकीय जन्म होऊन किती दिवस झाले आहेत, मोदीनंतर इथले खासदार लोकप्रिय असल्याचा त्यांचा समज आहे.


पाच वर्षात रेल्वे आली नाही. केंद्राच्या गॅजेटमध्ये झारखंडमधील ज्योतिर्लिंग आहे, परळीचा वैद्यनाथ नाही. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प होऊ शकले नाहीत. त्यामुळे ते मंजूर करावेत एवढी अक्कल सुद्धा आमच्या पालकमंत्र्यांना नाही.


छगन भुजबळ


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आम्हाला तुरुंगाची भीती नाही. बाळासाहेब ठाकरे बरोबर काम केले आहे, असा घाबरणार नाही. मी जामिनावर आहे असे तुम्ही म्हणता, मी भ्रष्टाचार केला असे तुम्ही म्हणता, मात्र तुमचे तर अनेक जण खून पाडणारे आहेत. गप्प बसणार्‍यांची औलाद छगन भुजबळ नाही.