केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 208 धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावातील 77 धावांच्या पिछाडीमुळे, भारतासमोर 208 धावांचं लक्ष्य आहे.


दरम्यान, आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

आफ्रिकेने आज दोन बाद 65 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र त्यांचा हुकमी फलंदाज हाशिम आमलाला मोहम्मद शमीने माघारी धाडून आफ्रिकेला गळती लावली. आमलाने 4 धावा केल्या. मग नाईट वॉचमन रबाडालाही शमीनेच बाद केलं.

त्यानंतर बुमराने कर्णधार ड्युप्लेसिला भोपळाही फोडू दिलं नाही, तर डिकॉकला अवघ्या 8 धावांवर माघारी धाडलं. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन डिव्हिलियर्सने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही.

डिव्हिलियर्सच्या रुपाने आफ्रिकेची दहावी विकेट गेली. डिव्हिलियर्सने 35 धावा केल्या. त्याला बुमराने भुवनेश्वरकरवी झेलबाद केलं.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या केपटाऊनच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं रद्द करावा लागला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात पावसामुळं एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. अखेर पंचांनी चहापानानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात दोन बाद ६५ धावांची मजल मारली होती.