T20 World Cup: पाच वर्षांनतर होऊ घातलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup)आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Indian Team) निवड आज होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. संघाची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या होऊ शकते. टी20 वर्ल्ड कपच्या संघ निवडीसाठी चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली आज निवड समितीची व्हर्चुअल बैठक होणार आहे. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री देखील असतील.  या बैठकीनंतर संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  


आयसीसीनं टीमची घोषणा करण्यासाठी 9 सप्टेंबरची डेडलाईन निश्चित केली होती. टीम इंडियाची घोषणा आज इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी निकालावर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.  


या खेळाडूंना मिळणार संधी


भारतीय क्रिकेट बोर्डाला  टी20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडणं सोपं नाही. आयपीएलमुळं अनेक खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. मात्र यात काही खेळाडूंनी निराश देखील केलं आहे.  पृथ्वी शॉ, सूर्याकुमार यादव, ईशान किशन आणि संजू सॅमसन या चौघांपैकी दोघांना संघात स्थान मिळू शकतं. तर इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबईकर शार्दुल ठाकूरला देखील संघात संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या जर गोलंदाजी करु शकला नाही तर त्याच्यासोबत शार्दुल ठाकूर चांगला पर्याय होऊ शकतो.  


संघाच्या कर्णधारपदाची धुरा अर्थातच विराट कोहलीकडे असणार आहे तर उपकर्णधार म्हणून रोहित शर्माकडे जबाबदारी असेल. संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल किंवा शिखर धवन असू शकतात. तर  पृथ्वी शॉ  किंवा सूर्यकुमार यादव खेळू शकतो. मधल्या फळीमध्ये कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत अशी तगडी फौज असू शकते.


वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असेल तर दिपक चहरला देखील संघात संधी मिळू शकते. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, क्रुणाल पांड्या यांचा समावेश होऊ शकतो.  



असा असू शकतो संघ


विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन