नांदेड : जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील अनेक भागात पूर सदृश्य परस्थिती असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर  शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.


काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. तर जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, तापी या प्रमुख नद्यासह ओढे व नाल्यांना मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. परिणामी मुखेड येथे मोती नाल्या वरून कार क्र-Mh 20 Dj 6925 ही 4 व्यक्तीसह  पुरात वाहून गेली असून त्यातील एका व्यक्तीस ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात आलेय.


नांदेड जिल्ह्यात 5 सप्टेंबरपर्यंत दडी मारलेल्या पावसाचे 6 सप्टेंबर पासून पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमी, नावघाट पूल ,नागिना घाट गुरुद्वारा परिसरातील मंदिरे  मुसळधार  पावसामुळे गोदावरी नदी पात्रात होत असलेल्या पाण्याच्या प्रचंड वीसर्गामुळे पाण्याखाली गेली आहेत. त्याच प्रमाणे शहरातील कौठा, देगलूर नाका, सिडको, नमस्कार चौक, पावडेवाडी, इतवारा परिसरातील सखल भागातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर जिल्ह्यातील भोकर तालुक्यात 105 मिलिमीटर, कंधार तालुक्यात 40 मिलिमीटर, नायगाव तालुक्यात 45 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नायगाव शहरानजीक असणाऱ्या ओढ्यामुळे गजाळी शाळा परिसर व शहरात गुढघाभर पाणी साचले असून  संपूर्ण शहरात पूर सदृश्य परिस्थिती आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होऊन हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत.


माहूर, हदगाव, किनवट तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला असून धर्माबाद तालुक्यातील कुंटुर,कारेगाव फाटा,नायगाव घुंगराळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घुंगराळा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे धर्माबाद, बिलोली, नांदेड राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. तर बिलोलो तालुक्यातील लघुळ, मुखेड तालुक्यातील उंद्री, माखणी, अंबुलगा, मंग्याळ, सावरगाव या परिसरातील पूल वाहून गेल्यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच  तालुक्यातील येवती येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्य व अन्न धान्य पुरात वाहून गेलेय. तर गावकऱ्यांच्या मदतीने वृद्ध व बालकांना गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातुन काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेय.


त्याच प्रमाणे लोहा तालुक्यातील उमरा ,लोहा तालुक्यातील फुलवळ,धानोरा गावात 100 मिलिमीटर  पेक्षा जास्त, ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे परिसरातील संपूर्ण शिवार पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पूर्ण गावातील घरात पाणी शिरल्यामुळे गावकरी हवालदिल झाले आहेत. याच प्रमाणे अर्धापुर तालुक्यातील सांगवी, सेलगाव, कोंढा,गणपूर, सावरगाव येथील आसना नदीला आलेल्या पुरामुळे शेती खरडून गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उमरी तालुक्यातील सिंधी गावालगत असणाऱ्या तळ्याच्या सांडव्यातून पाण्याचा मोठा विसर्ग  रस्त्यावरून होत असल्याने फुलंब्री, शिवणगाव, कारला ,पळसगाव रेल्वे टेशन जाण्याची वाहतूक सर्व पणे बंद झालेली आहे. 


जिल्हाभरात चालू असलेल्या ह्या पावसामुळे विष्णुपुरी जलाशय तुडुंब भरला त्याचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदी पात्रात मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर दुथडी भरून वाहणाऱ्या नदी पात्रातून व पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहने नेऊन अथवा स्वतः जाऊन नागरिकांनी अति धाडस दाखवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेय.


महत्वाच्या बातम्या :