मुंबई : भारत द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 नं पिछाडीवर आहे. पहिल्याच कसोटीत भारताला 72 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. याच पराभवाबाबत टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं रोखठोक मत माडलं आहे. उर्वरित मालिकेत भारत पुनरागमन करेल अशी आशा फारच कमी आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग म्हणाला की, 'आता तर असं वाटतं की, पुनरागमनची शक्यता फक्त 30 टक्के आहे. भारतीय टीम व्यवस्थापनाला हे देखील पाहायला हवं की, सेन्चुरियनमध्ये अश्विन संघात असायला हवा की नको.'
सेहवागच्या मते, भारताला सात फलंदाज आणि चार गोलंदाजांसह उतरायला हवं. 'भारताकडे अजिंक्य रहाणे हा अतिरिक्त फलंदाज उपलब्ध आहे. त्यामुळे त्याला संधी देता येऊ शकते. जर भारताला मालिका जिंकायची असेल तर विराट आणि रोहितला महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल.' असंही सेहवाग म्हणाला.
दरम्यान, याचवेळी सेहवागनं काही टिप्सही दिल्या. 'फलंदाजांना माझा सल्ला आहे की, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करु नका. जेवढं शक्य आहे तेवढं सरळ बॅटने खेळा. तुमचे फटके स्ट्रेट ड्राईव्ह किंवा फ्लिक असले पाहिजेत. तसंच शॉर्ट पिच चेंडू अंगावर घेण्याची क्षमता ठेवा. कारण की, द. आफ्रिकेत चेंडू उसळतो. त्यामुळे बोल्ड होण्याची शक्यता कमी असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन फलंदाजांनी सकारात्मक पद्धतीनं खेळणं गरजेचं आहे.' असंही सेहवाग यावेळी म्हणाला.
संबंधित बातम्या :
टीम इंडियाच्या पूर्वतयारीच्या अभावाने केपटाऊनमध्ये दाणादाण?
दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला, 72 धावांनी मात