मुंबई : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) डोपिंगच्या (Doping) जाळ्यात अडकली आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धावपटू दुती चंदने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या डोपिंग टेस्ट (Doping Test) मध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर (SARMs) हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर तिचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं होतं. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका
दुती चंदने आशियाई स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. दुतीने 2021 साली ग्रां प्रीमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम रचला होता. आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय अॅथलीट दुती चंदवरील बंदी जानेवारी 2023 पासून ग्राह्य धरली जाईल. 'द ब्रिज'च्या रिपोर्टनुसार, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) च्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी डोपिंग चाचणीसाठी दुती चंदचे नमुने (Sample) घेतले होते.
दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात
दुतीच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळले आहेत. दुती यांना बी नमुना चाचणी देण्याची संधी होती. त्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र दुतीने तसं केलं नाही.
जानेवारी 2023 पासून चार वर्षांची बंदी
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) या वर्षी जानेवारीमध्ये दुतीला निलंबित केलं होतं. यामुळे ती आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये दुतीची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये दुती पॉझिटिव्ह आली होती. जानेवारी 2023 मध्ये दुती चंदवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
डोपिंग म्हणजे काय? (What is Athletic Doping)
डोपिंग हा शब्द क्रीडा स्पर्धांसंदर्भात वापरला जातो. डोपिंग (Doping in Sport) म्हणजे स्पर्धात्मक खेळांमध्ये फसवणूक करण्याचा एक मार्ग आहे. काही खेळाडू खेळामध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी औषधांचा (Medicine or Drugs) वापर करतात. ऍथलेटिक स्पर्धकांद्वारे प्रतिबंधित खेळामध्ये कामगिरी वाढवणाऱ्या औषधांचा वापर करण्यास प्रतिबंध आहे.
दुती चंदला जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक
दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. दुती चंद ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला धावपटू आहे. तिने आशियाई गेम्समध्ये 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.
दुती चंदला आपली बाजू मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत
डोपिंगविरोधी समितीने सांगितलं की, दुतीने 3 जानेवारीपासून आतापर्यंत घेतलेल्या सर्व स्पर्धांमधील कामगिरी अपात्र ठरवली जाईल. शिक्षेविरुद्ध डोपिंग विरोधी अपील पॅनेलसमोर आपली बाजू मांडण्यासाठी दुतीला 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नॅशनल अँटी-डोपिंग डिसिप्लिनरी पॅनेल (ADDP) समोर सुनावणीमध्ये दुतीने प्रतिबंधित औषधं घेतली नसल्याचं सांगितलं होतं. पण, ती हे सिद्ध करू शकली नाही. यानंतर ADDP ने अनुच्छेद 2.1 आणि 2.2 उल्लंघन प्रकरणात दुती चंदवर चार वर्षांची बंदी घातली आहे.
दुती चंद समलैंगिक पार्टनरसोबत प्रेमसंबधात
दुती हिने आपण समलैंगिक असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर दुतीने तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली होती. या दोघींनी लग्न केल्याच्याही चर्चा आहेत. मात्र त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :