PM Modi Dream India 2036 Olympics host : भारत आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे देशातील हजारो क्रीडापटूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
पीएम मोदी म्हणाले की, "जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून भारताने दाखवून दिले आहे की आपला देश मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आता 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे भारताचे स्वप्न आहे. यासाठी आम्ही तयारी करत आहोत. यासोबतच पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंचे मोदींनी अभिनंदन केले.
2036 ऑलिम्पिक भारतासाठी एक स्वप्न
2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद हे भारताचे स्वप्न आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याच महिन्यात क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकसभेत सांगितले होते की, भारत ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) ऑलिंपिक खेळांचे यजमानपद कोणाला मिळेल याचा निर्णय घेते. 2028 ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराकडे सोपवण्यात आले आहे. 2032 ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहेत.
2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यात भारताला यश आले तर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय खेळाडू त्यांच्या देशात त्यांच्या चाहत्यांसमोर खेळतील. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एका रौप्यसह 6 पदके जिंकली होती. नीरज चोप्राने रौप्य तर मनू भाकर, कुशल स्वप्नील, सरबजीत सिंग, अमन सेहरावत आणि भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले.
पॅरालिम्पिकमध्ये भारताला चांगल्या कामगिरीची आशा
2020 च्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताने एकूण 19 पदके जिंकली होती. भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकून देशाचा गौरव केला होता. यावेळी भारतीय संघात एकूण 84 खेळाडूंचा समावेश असणार आहे.