लाहोर : पाकिस्तानमध्ये 2009 नंतर पहिल्यांदाच आंरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. यामध्ये केवळ 2015 साली झिम्बाब्वोविरुद्ध झालेला सामना अपवाद आहे. 2009 मध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता.

पुढील महिन्यात पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात लाहोरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड इलेव्हनचं नेतृत्त दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डूप्लेसी करणार आहे. वर्ल्ड इलेव्हनमध्ये सात देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या मालिकेसाठी खेळाडू पाठवण्यासाठी भारताने नकार दिला आहे.

वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. झिम्बाम्ब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर या मालिकेसाठी वर्ल्ड इलेव्हनचा प्रशिक्षक असेल. तर खेळाडूंना आयसीसीकडून मानधन देण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज संघ नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानने देशात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये भारतीय खेळाडू नसल्याची आफ्रिदीला खंत


संघ :

पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर जमान, अहमद शहजाद, बाबर आजम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमिर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान

वर्ल्ड इलेव्हन : फाफ डूप्लेसी (कर्णधार), हाशिम अमला, जार्ज बेली, पॉल कॉलिंगवूड, बेन कटिंग, ग्रँट इलियट, तमीम इकबाल, डेव्हिड मिलर, टिम पेन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी, सॅम्युअल बद्री, मॉर्ने मॉर्केल आणि इम्रान ताहीर