पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये 'भाजप हटाओ, देश बचाओ' या रॅलीमार्फत आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या रॅलीला तुफान गर्दी जमली. विरोधी पक्षातील सोनिया गांधी आणि मायावतींनी मात्र रॅलीला गैरहजेरी लावली.
पाटणातील ऐतिहासिक गांधी मैदानातून या रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्यासोबत जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादवदेखील उपस्थित होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून शरद यादव चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे शरद यादव विरोधकांसोबतच जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.
रॅलीत कुणाकुणाचा सहभाग?
लालूप्रसाद यादव यांच्या या रॅलीत विरोधी पक्षातील जवळपास 16 पक्षांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आरजेडी, काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांनी सहभाग घेतला होता.
शरद यादव यांच्यावर जेडीयूचं स्पष्टीकरण
विरोधकांच्या रॅलीत सहभागी झालेले शरद यादव यांच्यावर जेडीयूकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू शरद यादव यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहे. तर शरद यादव यांनी विरोधकांच्या रॅलीत जाऊन स्वेच्छेने पक्ष सोडल्याचा दावा जेडीयूने केला आहे.