कॅण्डी (श्रीलंका) : महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीनं टीम इंडियासमोरचं पराभवाचं विघ्न अखेर दूर झालं. भारतानं कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत श्रीलंकेवर तीन विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळं टीम इंडियासमोर विजयासाठी 47 षटकांत 231 धावांचं लक्ष्य होतं. पण श्रीलंकेच्या अकिला धनंजयनं सहा विकेट्स काढून भारताची सात बाद 131 अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली होती. त्यामुळं टीम इंडियासमोर पराभवाचं संकट उभं राहिलं होतं. त्या परिस्थितीत धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहल यांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला 50 षटकांत आठ बाद 236 धावांत रोखलं होतं. जसप्रीत बुमरानं 43 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना माघारी धाडलं. यजुवेंद्र चहलनं 43 धावांत दोन फलंदाजांचा काटा काढला. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं एकेक विकेट घेतली.