हॅमिल्टन : न्यूझीलंडमध्ये पहिली ट्वेन्टी-20 मालिका जिंकण्याची संधी भारतीय क्रिकेट संघाला चालून आली आहे. भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता भारत बुधवारी मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. भारताने ऑकलंडमध्ये पहिले दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने अनुक्रमे सहा व सात गडी राखून जिंकून पाच सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.


याआधी भारताला दोन वेळेला मालिका जिंकण्यात अपयश आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2008-09 मध्ये 0-2 अशी मालिका गमावली होती. तर 2019 मध्ये भारताला 1-2 असे पराभूत व्हावे लागले होते. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मागील काही टी-20 मालिकांमध्ये भारताचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी सुधारत असली तरी त्याचा क्रमवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्या भारतीय संघ ट्वेन्टी-20 क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. जर, पुढचे तिन्ही सामने भारताने जिंकले तर भारत चौथ्या स्थानी जाऊ शकतो.




ऑस्ट्रेलियात या वर्षी रंगणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ तयार होणे फार गरजेचे आहे. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता मिटली आहे. या सर्व बाबींचा विचार करता तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ कुठला मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मंगळवारी एच्छिक सराव सत्र होते आणि त्यात कर्णधार विराट कोहली, राहुल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा सहभाग नव्हता.


संभाव्य संघ -
भारत : विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल(यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.


न्यूझीलंड : केन विल्यम्सन(कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेइफर्ट(यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.


वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 12.20 वा.


Sarfaraj Khan | रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या सरफराज खानचं त्रिशतक | ABP Majha