नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विजय मिळवत टीम इंडियाने नवा विक्रम केला. भारताने 2017 या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले, ज्यापैकी 37 सामन्यांमध्ये विजय मिळवला, जे एका वर्षातील भारतीय संघाचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. एका वर्षात सर्वाधिक विजय (38) मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.


भारताने 2017 मध्ये 11 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी सात सामन्यात विजय मिळाला, तर एकात पराभव आणि दोन सामने अनिर्णित राहिले. या वर्षात खेळलेल्या 29 पैकी 21 सामन्यात भारताला विजय मिळवता आला. सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला. 2017 मध्ये खेळलेल्या 13 पैकी 9 टी-20 सामन्यात विजय मिळाला, तर 4 मध्ये पराभव मिळाला.

भारताच्या विजयाच्या दृष्टीने हे एका वर्षातील सर्वोत्कष्ट प्रदर्शन आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारताने 46 पैकी 31 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. गेल्या वर्षी भारताने 9 कसोटी, 7 वन डे आणि 15 टी-20 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. एका वर्षात सर्वाधिक वन डे सामने जिंकण्याचा विक्रम भारताने 1998 मध्ये केला होता. तेव्हा भारताने एकाच वर्षात 24 सामने जिंकले होते.

एका वर्षातील भारताच्या विजयाचं रेकॉर्ड पाहिलं तर, 2010 आणि 2013 मध्ये 29-29, तर 2007 मध्ये 28 सामने जिंकले. भारताने 1998 मध्ये 26 सामने जिंकले होते, जो टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा मोठा विक्रम होता.

एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्टेलियाने 2003 मध्ये 47 पैकी 38 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (1995 मध्ये 35 विजय), पाकिस्तान (2011 मध्ये 34 विजय), ऑस्ट्रेलिया (2007 आणि 2009 मध्ये 33 विजय) आणि श्रीलंका (2014 मध्ये 33 विजय) यांचा नंबर लागतो.

भारत सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारताने यंदा कसोटीतही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. एका वर्षात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (1984) नावावर आहे. त्यानंतर इंग्लंड (2014) आणि दक्षिण आफ्रिका (2008) यांचा क्रमांक लागतो. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने 2002, 2004 आणि 2006 मध्ये 10-10 सामने जिंकले होते. भारताचा 9 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आहे, जो 2016 मध्ये करण्यात आला होता.

एका वर्षात सर्वाधिक वन डे सामने जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने 2003 मध्ये 30 वन डे सामने जिंकून हा विक्रम केला होता. तर टी-20 मध्ये एका वर्षात सर्वाधिक सामने (2016 मध्ये 15 सामने) जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तान (2016 मध्ये 11 सामने) आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये दहा सामने जिंकले होते.