चेन्नई : करुण नायरच्या खणखणीत त्रिशतकानंतर रवींद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे, भारताने चेन्नई कसोटीतही तिरंगा फडकवला. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीतही पाणी पाजून, मालिका 4-0 ने खिशात टाकली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली.


चेन्नई कसोटी भारताने 1 डाव आणि 75 धावांनी जिंकली.

करुण नायर या विजयाचा नायक आहेच, पण 199 धावा ठोकणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि इंग्लंडचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूत धाडणार रवींद्र जाडेजा हे सहनायक आहेत. जाडेजाने दुसऱ्या डावात तब्बल 7 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 207 धावांवर आटोपला.

या सामन्यात डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 282 धावांची आवश्यकता होती. पण अखेरच्या दिवशी किटन जेनिंग्स आणि अॅलेस्टर कूकनं सावध सुरुवात करुन 103 धावांची भागीदारी रचली. पण उपाहारानंतर रवींद्र जाडेजानं प्रभावी मारा करुन इंग्लंडचं कंबरडं मोडलं. रवींद्र जाडेजानं 48 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. तर उमेश, ईशांत आणि अमित मिश्रानं प्रत्येकी एकेक विकेट काढून त्याला छान साथ दिली.


84 वर्षांनी मोठा विजय

कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकानं विजय साजरा केला आहे. तसंच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतानं एखाद्या संघावर 4-0 अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटच्या टीमनं इंग्लंडला 4-0 असं लोळवलं आहे.  1932 सालापासून भारतीय संघ आजवर 152 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यात केवळ दुसऱ्यांदाच भारतानं 4-0 असा विजय मिळवला आहे.

भारताचा पहिला डाव

दरम्यान, करुण नायरचं त्रिशतक, राहुलच्या 199, अश्विनच्या 67 तर जाडेजाने 51 धावांच्या जोरावरच भारताने पहिला डाव सात बाद 759 धावांवर घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने नोंदवलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेरीस भारताला इंग्लंडवर 282 धावांची आघाडी मिळाली.

दुसरीकडे करुण नायरने चेन्नई कसोटीत त्रिशतक तर झळकावलंच, शिवाय मोठ्या भागीदारीही रचल्या. करुणने लोकेश राहुलसह चौथ्या विकेटसाठी 161 धावांची, रवीचंद्रन अश्विनसह सहाव्या विकेटसाठी 181 धावांची आणि रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. राहुलने 199, अश्विनने 67 तर जाडेजाने 51 धावा केल्या.

संबंधित बातम्या
इंग्लंडविरुद्ध करुण नायरचं त्रिशतक, भारताकडे 270 धावांची आघाडी

पाकिस्‍तानच्या शफीकची झुंज अपयशी, ऑस्‍ट्रेलियाचा 39 धावांनी विजय

करुणचं त्रिशतक, सेहवागचं हटके ट्विट

चेन्नईत 'करुण'सह भारतानंही रचला विक्रम...

मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर

वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल