हरारेः धोनीच्या टीम इंडियाने हरारेच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा दहा विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताला विजयासाठी केवळ 100 धावांचं माफक आव्हान दिलं होतं.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनदीप सिंहने अर्धशतक झळकावलं. मनदीपने 40 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 धावांची खेळी उभारली. तर लोकेश राहुलने 40 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 47 धावा ठोकल्या. मनदीप आणि राहुलने 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बरिंदर सरन आणि जसप्रित बुमराने भारताच्या विजयाचा पाया घातला. सरनने दहा धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढून झिम्बाब्वेच्या आघाडीच्या फळीचं कंबरडं मोडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण साजरं केलं. तर जसप्रीत बुमराने 11 धावांत तीन विकेट्स काढल्या.
धवल कुलकर्णीने एक विकेट काढून आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणात समाधानकारक कामगिरी बजावली. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 20 षटकांत नऊ बाद 99 धावांवर रोखण्याची कमाल केली.