नांदेडः वर्गात कॉपी.. शर्टात कॉपी.. पॅडखाली कॉपी.. सगळीकडे कॉपीच कॉपी..भरारी पथकाला नांदेड विभागातील 85 केंद्रांवर हे दृश्यं दिसत होतं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत पदोन्नती मिळवण्यासाठी डिग्री घेणाऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल 8 हजार 400 सरकारी कर्मचाऱ्यांना कॉपी करताना पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कॉपी करताना सापडलेले लोक पाहा.. कोणी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस अशा पदांवर कार्यरत आहेत.


 

 

विद्यार्थ्यांना कॉपी मुक्तीचे धडे देणारे शिक्षक, बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालणारे पोलिस, जनतेची सेवा करणारे ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात असे कृषी सहाय्यक आणि रुग्णांची सेवा करणारे आरोग्य कर्मचारी पदोन्नतीसाठी किती लाचार झाले आहेत, हे समोर आलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात मिळून 1 लाख 17 हजार विद्यार्थी परीक्षा देत होते. ही परीक्षा 11 ते 28 मे दरम्यान झाली. या परीक्षेदरम्यान नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या 20 जणांच्या भरारी पथकाला 10 हजार कॉपी बहाद्दर सापडले. या कॉपी बहाद्दरांना पकडताना भरारी पथकाला देखील नाकी नऊ आले.

 

 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला विधीमंडळ आणि युजीसीची मान्यता आहे. एमपीएससी आणि यूपीएससीची परीक्षाही मुक्त विद्यापीठाच्या पदवीवर देता येते.

 

आता तरी प्रशासनाला जाग येणार का?

 

समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठानं पूर्वतयारी हा वैशिष्यपुर्ण अभ्यासक्रम तयार केला. पण या चांगल्या गुणांबरोबरच विद्यापीठाने दिलेल्या उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीला वाव आहे. काही काही सेंटर कॉपी स्टेशन्स झाली आहेत.

 

 

दरम्यान कॉपीच्या जोरावर पदव्या घेऊन हे सर्व अधिकारी पदोन्नती मिळवणार आहेत. हे चित्र फक्त नांदेड विभागातीलच आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर अशी किती फौज आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.