कॅण्डी : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, श्रीलंका दौऱ्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराने पाच विकेट्स घेऊन, तर रोहित शर्माने नाबाद शतक ठोकून भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी अवघं 218 धावांचं आव्हान होतं. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताची चार बाद 61 अशी अवस्था करून सामन्यात रंग भरला. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी 139 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळं या सामन्यात पंचांनी टीम इंडियाला आठ धावा आधीच विजय बहाल केला. मात्र काही वेळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करण्यात आली.
या सामन्यात रोहित शर्माने वन डे कारकीर्दीतलं बारावं शतक साजरं केलं. त्याने नाबाद 122 धावांची, तर धोनी नाबाद 61 धावांची खेळी केली.
त्याआधी, भारताच्या जसप्रीत बुमराने 27 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून, या सामन्यात श्रीलंकेला नऊ बाद 217 धावांत रोखलं. लहिरू थिरीमनेच्या 80 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर पुन्हा नांगी टाकली. त्यात जसप्रीत बुमराने पाच विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेतही त्याने चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता.
रोहित शर्मा-धोनीची अभेद्य भागीदारी, भारताचा 6 विकेट्सने विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2017 10:37 PM (IST)
भारताने कसोटी मालिकेनंतर वन डे मालिकाही 3-0 ने खिशात घातली आहे. श्रीलंका दौऱ्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -