गॉल: विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावांत गुंडाळून गॉल कसोटीत 304 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतानं या विजयासह श्रीलंका दौऱ्यातल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियानं या विजयासह 2015 सालच्या गॉल कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचीही परतफेड केली. या कसोटीत भारताने पहिल्या डावातील 309 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 240 धावांसह, श्रीलंकेसमोर विजयासाठी 550 धावांचं भलंमोठं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य श्रीलंकन फलंदाजांना झेपलं नाही. भारताने लंकेचा दुसरा डाव अवघ्या पाच तासात 245 धावांत आटोपला. श्रीलंकेचे रंगना हेरथ आणि दास गुणरत्ने हे दुखापतीमुळे फलंदाजीसाठी उतरले नाहीत. त्यामुळे भारताने लंकेला 8 बाद 245 धावांत रोखलं. दरम्यान, आज सकाळी कर्णधार विराट कोहलीनं वैयक्तिक शतक झळकावून, भारताचा दुसरा डाव तीन बाद 240 धावांवर घोषित केला. त्यामुळं श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल 550 धावांचं आव्हान होतं. सलामीच्या दिमुथ करुणारत्नेच्या झुंजार फलंदाजीचा अपवाद वगळला तर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सपशेल शरणागती स्वीकारली. दिमुथ करुणारत्नेने 97 धावा केल्या. तर निर्सोह डिकवेलाने 67 धावा करुन त्याला चांगली साथ दिली. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शमी आणि उमेश यादवने 1-1 फलंदाज टिपले. संबंधित बातम्या कोहलीचं शतक, श्रीलंकेसमोर 550 धावांचं लक्ष्य