बीड: पोलिसांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण पोलिसांनी पीक विम्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केलाच. मात्र पोलिसांची ही दादागिरी समोर आणणाऱ्या पत्रकारालाही त्यांनी बेदम मारहाण केली.


पीक विम्यासाठी शिवार सोडून बँकेच्या रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करत आहेत. पोलिसांची ही मग्रुरी माध्यमं जनतेसमोर आणत असताना, आता पोलिसांची दादागिरी थेट माध्यम प्रतिनिधींवर हात उचलण्यापर्यंत पोहोचली आहे.

माजलगावात बँकेच्या रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला, पोलिसांनी बेदम मारहाण केली.

माजलगावमधील बँकेसमोर शेतकऱ्यांची रांग होती. या रांगेतील शेतकऱ्यांवर पी एस आय अंधारे आणि पोलीस कॉन्स्टेबल सिनगारे यांनी लाठीमार केला.

त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक दैनिकाचे वार्ताहर मिलिंद चोपडे यांनी पोलिसांचा लाठीमार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. मात्र हे एका पोलिसाने पाहिलं आणि त्यांनी थेट चोपडे यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांनी मोबाईल काढून घेऊन, थेट चोपडे यांना मारहाण केली.

यावेळी चोपडे यांनी आपण पत्रकार असल्याचं सांगितलं, पण तू कोण पत्रकार, अशी अरेरावी करत, पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली.

पीक विमा भरण्यासाठी आधी ऑनलाईन आणि मग आता ऑफलाईन सुरुवात केली आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना रान सोडून रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यातच रांगेत उभं राहूनही जर पोलिसांचा मार खावा लागत असेल, तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे.

कारण आघाडी सरकारच्या काळात मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारावेळी, विरोधात असलेल्या शिवसेना-भाजपने  रान उठवलं होतं. मात्र तोच प्रकार जर फडणवीसांच्या काळातही घडणार असेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? असा प्रश्न आहे.