कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोच्या चौथ्या वन डेत श्रीलंकेचा 168 धावांनी धुव्वा उडवला आणि धोनीच्या तीनशेव्या वन डेचं शानदार सेलिब्रेशन केलं. या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 376 धावांचं आव्हान दिलं होतं.
भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव 207 धावांत गडगडला. टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आपली विजयी आघाडी 4-0 अशी वाढवली. भारताकडून जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
विराट कोहली आणि रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने कोलंबोच्या वन डेत 50 षटकांत पाच बाद 375 धावांची मजल मारली होती. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी रचली.
विराटने 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांची, तर रोहितनं 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली. मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 101 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पांडे 50, तर धोनी 49 धावांवर नाबाद राहिला.
धोनीचं सामन्यांचं त्रिशतक
श्रीलंकेविरुद्धचा कोलंबो वन डे धोनीचा तीनशेवा वन डे होता. भारताच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सामन्यांचं त्रिशतक साजरं करणारा धोनी हा सहावा शिलेदार ठरला. याआधी सचिन तेंडुलकरने 463, राहुल द्रविडने 344, मोहम्मद अझरुद्दिनने 334, सौरव गांगुलीने 311 आणि युवराज सिंहने 304 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या रथीमहारथींच्या ‘क्लब थ्री हण्ड्रेड’मध्ये आता धोनीची एण्ट्री झाली.