पुणे : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरीची केली आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.


फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी टीच्चून गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.

सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाने पहिल्या डावात तब्बल 601 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला उत्तर देताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने आफ्रिकेच्या संघावर फॉलोऑन लादून दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

दुसऱ्या डावातही आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. सलामीवीर एडन मार्क्रम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर डी-ब्रूनही (8 धावा)उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. सलामीवीर डीन एल्गरने आफ्रिकेकडून सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. बुवामा (38) आणि व्हर्नॉन फिलँडर (37) व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला फार वेळ मैदानात उभे राहता आले नाही.

भारताकडून रवींद्र जडेजा (52 धावांत 3 बळी) आणि उमेश यादवने (22 धावांत 3 बळी) टिच्चून गोलंदाजी केली. तसेच रवी अश्विननेदेखील (45 धावांत 2 बळी) त्यांना चांगली साध दिली.

दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 254 धावा, सलामीवीर मयांक अग्रवालच्या 108 धावा, रवींद्र जडेजा ( 91), उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 59) आणि चेतेश्वर पुजारा ( 58)च्या शानदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेसमोर 5 बाद 601 धावांचा डोंगर उभा केला होता.

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला. केशव महाराज आणि व्हर्ननॉन फिलँडर या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद 275 पर्यंत मजल मारली होती. द. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 72 धावा फटकावल्या. त्याला व्हर्ननॉन फिलँडरने नाबाद 44 धावा काढत चांगली साथ दिली. तसेच मधल्या फळीत कर्णधार फॅफ डू प्लेसिसने (64) अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून रवी अश्विन (69 धावात 4 बळी) आणि उमेश यादवने (37 धावात 3 बळी) टीच्चून गोलंदाजी केली. मोहम्मद शमी (44 धावात 2 बळी) आणि रवींद्र जडेजाने (81 धावात 1 बळी)त्यांना चांगली साथ दिली.