नवी दिल्ली : विराट कोहलीच्या टीम इंडियानं दिल्लीच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा ५३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघानं डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहराला शानदार निरोप दिला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान दिलं होतं.  न्यूझीलंडला त्या आव्हानाचा पाठलाग करणं झेपलं नाही. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २० षटकांत आठ बाद १४९ धावांत रोखलं. टीम इंडियाचा टी-20 सामन्यांच्या इतिहासात न्यूझीलंडवरचा हा पहिलाच विजय ठरला.

या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मानं दिलेल्या १५८ धावांच्या विक्रमी सलामीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत तीन बाद २०२ धावांची मजल मारली.

त्या दोघांनी भारताकडून वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीरनं रचलेल्या १३६ धावांच्या भागिदारीचा विक्रम मोडला. धवननं ५५ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची खेळी उभारली.

रोहितनं ५२ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ८० धावांची खेळी सजवली. त्यानंतर विराट कोहलीनं अकरा चेंडूंत तीन षटकारांसह नाबाद २६, तर महेंद्रसिंग धोनीनं दोन चेंडूंत एका षटकारासह नाबाद सात धावा केल्या. भारताच्या चार फलंदाजांनी दहा षटकारांची बरसात केली.

संबंधित बातम्या :

संपूर्ण कारकिर्दीत बदलायचं झालं तर 2003 ची फायनल बदलेन: नेहरा


नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा...


VIDEO : हवेत सूर मारुन पांड्यानं टिपला अप्रतिम झेल!