बिजिंग : भारतात राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यावरुन वाद सुरु असतानाच, तिकडे चीन मात्र राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याच्या विचारात आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाच्या अवमानकर्त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.


'सिन्हुआ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल पिपल्स काँग्रेस (पीपीसी) च्या स्थायी समितीच्या द्वैमासिक सत्रात याबाबतचा एक प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये चिनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वाजाचा अवामानकरर्त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस आहे.

वास्तविक, सद्या राष्ट्रगीताचा अवमान केल्यास 15 दिवसांचा तुरुंगवास द्यावा. तसेच त्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले चालवावेत, अशी तरतूद करण्यात आली आहे.

या प्रस्तावावर एनपीसीच्या स्थायी समितीचे विधी प्रकरणाच्या आयोगातील सदस्य वांग चाओयींग यांनी सांगितलं कि, "गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रध्वज, आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करण्याला दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्याला शिक्षेची तरतूद कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे."

या नव्या कायद्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान केल्यास, त्या व्यक्तीकडून राजकीय अधिकार काढून घेऊन तत्काळ अटक करणे, नजरकैद आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.